प्रथम स्नेहसंमेलन..!

दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी “राजे चंद्रराव मोरेकुलोत्पन्न” जावलीकर ‘राव’ मोरे परिवाराचे ऐतिहासिक असे “प्रथम स्नेहसंमेलन”,‘जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था, मुंबई’ मार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. सदर स्नेह्संमेलनास ठाणे, पालघर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास ५० गावातील ६००‘राव’ मोरे परिवारातील बंधू – भगिनी उपस्थित होते.

स्नेहसंमेलना दरम्यान परिवारातील विविध क्षेत्रातील बंधू-भगिनींचा ‘राजे चंद्रराव’ पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. यात श्री. निखिल निळकंठराव दरेकर यांना गोवंश संरक्षक पुरस्कार, कु. कोमल दिलीपराव मोरे व कु. धनश्री अनिलराव मोरे यांना शैक्षणिक पुरस्कार, कु. निकिता जगन्नाथराव दरेकर, श्री. रुपेश राजारामराव मोरे, कु. सानिध्य संजयराव मोरे व श्री. अक्षय अरुणराव दरेकर यांना क्रीडा पुरस्कार, श्रीमती कमलाबाई रघुनाथराव मोरे यांना विरनारी पुरस्कार, श्री. सुरेश शिवरामराव मोरे, श्री. प्रशांत दिलीपराव मोरे व श्री. वसंत चंद्रकांतराव मोरे यांना प्रशासकीय शौर्य पुरस्कार. शहीद कै. प्रकाश पांडुरंगराव मोरे व शहीद कै. सुभाष नारायणराव मोरे यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार तसेच श्री. संदीप दौलतराव मोरे व कु. ऋचा कृष्णकांतराव दरेकर यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या संकेत स्थळाचे देखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सदर स्नेह्संमेलनास ज्येष्ठ इतिहासकार श्री. आप्पा परब यांची कन्या (इतिहास संशोधक-संकलक) सौ. शिल्पा प्रधान-परब प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. सौ. शिल्पा प्रधान यांच्या साधारण पावणे दोन तासाच्या भाषणात त्यांनी‘सन एक हजारपासून, चंद्रगुप्त मौर्य ते साधारण १४९० पासून महाराष्ट्रात, जावळीत सत्ता स्थापन करणारे ‘राजे चंद्रराव मोरे घराणे’ यांचा सत्ता प्रवास तसेच त्या कालखंडातील राजकीय, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती आणि आठव्या चंद्ररावां पासून स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेच्या संक्रमणाचा काळ, त्यावेळची सामाजिक, राजकीय बदलांबाबत अत्यंत स्पष्टपणे ऐतिहासिक दाखले देत विश्लेषण केले. ‘स्वराज्य विरोधी’ राजे चंद्रराव मोरे घराणे ‘बेताल बेबुनियाद’आरोपांचे देखील त्यांनी अतिशय परखडपणे तत्कालीन विविध घटनांच्या आधारे खंडन केले. मोरे घराणे शिव-छत्रपती विरोधी अथवा स्वराज्य-द्रोही कधीच नव्हते.

संस्था व्यासपीठा वरून नि:स्वार्थ भावनेने ‘राव’ मोरे परिवाराच्या हितार्थ, प्रत्यक्षात आकार घेऊ पाहणाऱ्या अनेक भावी महत्वाकांक्षी उपक्रमांबाबत व संस्था जडण-घडणी बाबत संस्था सचिव श्री. विनोदराव मोरे यांनी परिवाराला मनमोकळे पणाने अवगत केले. संस्था अध्यक्ष श्री. सुहासराव मोरे यांनीअध्यक्षीय भाषणात संस्थे मार्फत भावी पिढीला यथाशक्ती मार्गदर्शन, दिशा-दर्शक पर्याय उपलब्ध करून दिले जातील असे सांगितले. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांच्या यज्ञाचा हा घोडा असाच चौखूर मार्ग क्रमण करेल असा विश्वास दिला. सरते शेवटी आपल्या‘राव’ मोरे परिवाराच्या प्रत्येक घटकाची संस्थेला हक्काची साथ असावी असे भावनिक आवाहन करून समस्त ‘राव’ मोरे परिवार पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

Brand
वेबसाइट भेटींची संख्या:

Contact Details